द्राक्ष पिकाला पावसाचा फटका बसल्यामुळे राज्यात द्राक्ष उत्पादनात ३५ टक्के घट होण्याचा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी पावसामुळे द्राक्षाच्या सूक्ष्म घड निर्मितीवर परिणाम झाला. दरम्यान, बागा वाचविण्यासाठी एकरी दुप्पट खर्च झाल्यामुळे आर्थिक गणित विस्कटले आहे. यंदा द्राक्ष हंगाम आटोपल्यानंतर एप्रिलअखेरपर्यंत खरड छाटण्या उरकल्या. खरड छाटणीमुळे पुढील हंगामातील सूक्ष्म घड निर्मिती आणि काड्यांची अपेक्षित वाढ होण्यास मदत होते. मात्र गेल्या दीड-दोन महिन्यांत द्राक्ष पट्ट्यात अतिवृष्टी झाली. त्याचा परिणाम सूक्ष्म घड निर्मितीवर झाला. तसेच बागांवर करपा, भुरी, डाऊनी, थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. काडी तयार करण्यासाठीच्या खर्चातही वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पोषक वातावरणामुळे घड निर्मिती होईल. परंतु कधी ढगाळ वातावरण, पावसाची रिमझिम यामुळे अजूनही अडचणी आहेत. या दरम्यान, खरड छाटणीनंतर पावसामुळे बागा वाचविण्यासाठी प्रति एकर दुप्पट खर्च झाल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.  द्राक्ष पट्ट्यातील काही भागात फळ छाटणी येत्या पंधरा-वीस दिवसांनंतर सुरू होईल. मात्र बहुतांश ठिकाणी सप्टेंबरपासून फळ छाटणीला गती येते. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पुन्हा पाऊस आणि वातावरणात बदल झाले तर घड जिरण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती यंदा पहिल्यांदाच उद्भवली आहे.

फळ छाटणी ऑगस्टपासून

यंदाच्या हंगामातील आगाप द्राक्ष फळ छाटणीचे नियोजन शेतकरी करू लागला आहे. काही भागात जुलै अखेरपासून फळ छाटणी सुरू होते. मात्र काही भागात ढगाळ वातावरण आहे, हलका पाऊस सुरू आहे. त्यामुळे जुलै अखेरपासून सुरू होणारी फळ छाटणी ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल. मात्र जुलैच्या अखेर किंवा ऑगस्टमध्ये पावसाला सुरुवात झाली, तर आगाप फळ छाटणी लांबणीवर पडू शकते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

https://agrowon.esakal.com/agro-special/grapes-in-trouble-heavy-rains-slash-production-by-35-in-maharashtra-mj18

माहिती शेअर करा