महिला स्वयंसहायता बचत गटांची उत्पादने ई-प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्या करिता उमेद मार्ट हे ई-प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेली आहेत. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यात महिला स्वयंसहायता समूहा मार्फत तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवारी (ता. ९) जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली. यावेळी ही माहिती देण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक दीपक दहे, पुणे येथील राज्य समन्वयक अरुण रसाळ, विभागीय समन्वयक तुकाराम कुराडे, जिल्हा व्यवस्थापन विपणन धनंजय भिसे,जिल्हा व्यवस्थापक उपजीविका विठ्ठल मुळे जिल्हाभरातून महिला उद्योजकांची उपस्थिती होती. माथूर म्हणाल्या, की जिल्हाभरातील बचत गटांच्या महिला आत्मनिर्भर आत्मविश्वासू बनत आहेत. आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी त्यांनी समाज माध्यमांचा उपयोग करावा. डिजिटल पेमेंट प्रणाली वापरावी.
लखपती दीदी योजनेत सर्वांनी चांगले काम करावे. बचत गटातील महिलांना कुठलीही मदत लागल्यास उमेद-डीआरडीए कार्यालय नेहमी मार्गदर्शन करेल पाटील म्हणाल्या, की ई – मार्केट प्लॅटफॉर्मवर ग्रामीण उत्पादनांची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांची क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यातील बचत गटांना आपले उत्पादन विक्रीसाठी आणखी बळ मिळणार आहे.