शेतजमिनीचे सूक्ष्म निरीक्षण, पिकांच्या आरोग्याचे परीक्षण, कीड व रोग नियंत्रण आणि अचूक फवारणीसाठी ड्रोनचा प्रभावी वापर केला जात आहे. ड्रोन म्हणजे मानवरहित विमान, ज्याला अनमॅन्ड एरियल व्हेइकल हे दूरनियंत्रण किंवा स्वयंचलित प्रणालीद्वारे चालवले जाते. ड्रोनवरील कॅमेरे आणि संवेदक पिकांची स्थिती अचूकपणे दर्शवितात, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी अचूक निर्णय घेणे शक्य होते. परिणामी, उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो.

परदेशातील अनेक शेतकरी पिकांची वाढ, घनता आणि रंगाचे निरीक्षण करण्यासाठी उपग्रह प्रतिमांचा वापर करतात, परंतु वातावरणातील बदलांमुळे किंवा इतर अडचणींमुळे ड्रोनद्वारे घेतलेल्या जवळच्या प्रतिमांच्या तुलनेत तेवढे प्रभावी ठरत नाहीत. उपग्रह छायाचित्रांची अचूकता मीटरमध्ये असू शकते, परंतु ड्रोनद्वारे घेतलेल्या पिकांचे किंवा स्थळांचे छायाचित्र मिलिमीटरपर्यंत अचूकता दर्शवू शकते. उदाहरणार्थ, लागवडीनंतर बियाणे न उगवल्यामुळे पडणाऱ्या नांग्या शोधणे, रोग व किडींची लक्षणे, अन्नद्रव्यांची कमतरता इत्यादी बाबी त्वरित निदर्शनास येतात आणि परिणामी तत्काळ योग्य उपाययोजना करता येतात.

सद्यःस्थितीत हे ड्रोन एक पीक पद्धतीत उत्तम कार्य करतात, परंतु आंतरपीक पद्धतीत किंवा अनेक पिके असलेल्या शेतांमध्ये काही मर्यादा येतात. या मर्यादा कमी करण्यासाठी ड्रोनमध्ये अधिक प्रभावी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी संशोधक प्रयत्नशील आहेत. त्यामुळे भविष्यात ड्रोन तंत्रज्ञानाची क्षमता निश्चितच वाढेल. ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने पीक व्यवस्थापन अधिक अचूक, कार्यक्षम आणि शास्त्रोक्त पद्धतीने हाताळणे शक्य झाले आहे.

https://agrowon.esakal.com/techno-wan/drone-technology-enhances-precision-farming-sai29

माहिती शेअर करा