भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबद्दल दोन्ही देशांनी व्यापक रूपरेषा जाहीर केली असली, तरी त्याचे सविस्तर तपशील अजूनही समोर आलेले नाहीत. परंतु प्राथमिक अंदाजानुसार भारत आपल्या कृषी बाजारपेठेत अमेरिकेला केवळ मर्यादित प्रवेश देण्याची शक्यता आहे. परिणामी मका, सोयाबीन, इथेनॉल, डेअरी यांसारख्या क्षेत्रांना या कराराचा फटका बसण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता. २) रात्री भारतासोबतच्या व्यापार कराराची घोषणा समाजमाध्यमांवर केली. त्यात भारताने अमेरिकेच्या वस्तूंवरील आयात शुल्क शून्य केल्याचा दावा करण्यात आला होता. अमेरिकेच्या कृषिमंत्री ब्रुक रॉलिन्स यांनी भारताची मोठी बाजारपेठ अमेरिकेच्या शेतीमालासाठी खुली झाल्याचे वक्तव्य केले होते. या घडामोडींमुळे अमेरिकेतील शेतीमालाची भारतात शुल्कमुक्त आयात सुरू होईल आणि त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती.

या पार्श्वभूमीवर प्राथमिक संकेतांनुसार केवळ बदाम, अक्रोड, पिस्ते, सफरचंद, नाशपाती आणि बेरी यांसारख्या उच्च मूल्य शेती उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करणे किंवा आयात कोटा वाढविण्यास भारत सहमती देऊ शकतो. तसेच फळे, भाजीपाला, वाइन आणि मद्य यांच्या व्यापारातील अडथळेही कमी केले जाऊ शकतात. भारत मका, सोयाबीन आणि सोयामील यांवरचे आयात शुल्क घटविण्याची शक्यता कमी आहे. भारतात कापूस वगळता जनुकीय बदल केलेल्या (जीएम) पिकांना परवानगी नाही.

https://agrowon.esakal.com/agro-special/limited-access-to-american-agricultural-products-rat16

माहिती शेअर करा