राज्यात पीक संरक्षण कामासाठी ड्रोन वापराचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत केवळ सरकारी योजनेतून १६ कोटींच्या ड्रोनची खरेदी झाली आहे. या वर्षी राज्यातील ड्रोनची संख्या ६०० च्या पुढे जाईल, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
केंद्राच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून ‘नमो दीदी ड्रोन’ तसेच राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ‘मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन’ योजना राबविली जात आहे. या दोन्ही योजनांमधून दहा लाख रुपयांपर्यंत ड्रोन प्रणाली विकत घेता येते. त्यात कृषी पदवीधरांसाठी पाच लाखापर्यंत अनुदान मिळते तर इतरांसाठी चार लाखापर्यंत अनुदान दिले जाते. ड्रोन अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर राज्यातून तीन हजार १४८ अर्ज आले होते. त्यातील एक हजार ९६९ अर्ज पात्र होते. त्यातील ६४४ अर्जांना पूर्वसंमतिपत्रे देण्यात आलेली आहेत.
कृषी अभियांत्रिकी संचालनालयाच्या म्हणण्यांनुसार, राज्यात आतापर्यंत १८० ड्रोनची खरेदी झाली आहे. संबंधित ड्रोनचालकांना आठ कोटी १५ लाख रुपयांचे अनुदान वाटण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. किसान ड्रोन खरेदीसाठी केंद्राने विशेष योजना लागू केल्यानंतर राज्यात ड्रोन सेवा सुविधा केंद्र स्थापन करण्याचे प्रमाण वाढले आहे. योजनेमुळे ग्रामीण नवउद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था तसेच शेतकरी गटांना ड्रोन घेण्याची संधी मिळते आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-agriculture-drone-usage-increasing-abhi47