राज्यात गतवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका हस्त बहरातील डाळिंबाला बसला आहे. सतत बदलत्या वातावरणामुळे ५० टक्के बागा संकटात सापडल्या आहेत. हस्त बहर धरणारे शेतकरी आंबिया बहराकडे वळले आहेत. परिणामी, हस्त बहरातील क्षेत्र अंदाजे १५ हजार हेक्टरने कमी झाले आहे.राज्यात दरवर्षी डाळिंबाचा हस्त बहर ३० ते ३५ हजार हेक्टरवर धरला जातो. या बहरातील डाळिंब मार्च-एप्रिलच्या दरम्यान विक्रीस येते. मात्र गतवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांत सर्वदूर पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना हा बहर साधता आला नाही. अशा परिस्थितीतही काही शेतकऱ्यांनी बहर धरला.

परंतु डाळिंबाला पोषक वातावरण नसल्याने फुलधारणा कमी-अधिक प्रमाणात झाली. त्यातच अति थंडी आणि थंडीचा कालावधी जास्त राहिल्याने फुलगळ झाली. तसेच परागीकरणासाठी मधमाश्यांची संख्या कमी राहिली. सातत्याने वातावरणातील बदलामुळे फळधारणेलाही अडथळे निर्माण झाले असून अवघे २० टक्केच सेटिंग झाले असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या सर्व कारणांमुळे जवळपास २० ते २५ हजार हेक्टरवरच हा बहर धरला गेला आहे. म्हणजेच राज्यात यंदा या बहरातील क्षेत्र १५ ते २० हजार हेक्टरने कमी झाले आहे. सद्यःस्थितीत डाळिंबाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे डाळिंबाची फळे १०० ते २०० ग्रॅम वजनाची आहेत. मात्र तापमान वाढू लागल्याने काही भागात पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. हस्त बहरातील डाळिंबाची विक्री येत्या पंधरा ते वीस दिवसांत सुरू होण्याची शक्यता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/hasta-bahar-pomegranate-orchards-crisis-rat16

माहिती शेअर करा