यंदा जागतिक शेतकरी महिला वर्ष साजरे केले जात आहे. या निमित्ताने शेती क्षेत्रातील महिलांच्या कार्य-कर्तृत्वाचा गौरव करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच दिल्ली येथे ‘ग्लोबल कॉन्फरन्स ऑन वूमन इन अ‍ॅग्री-फूड सिस्टिम्स २०२६’ आयोजित करण्यात आली.या परिषदेच्या समारोप सत्रात भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात ‘आयसीएआर’ने देशभरातील ९०० हून अधिक संस्थांना जोडणारा राष्ट्रीय जेंडर प्लॅटफॉर्म विकसित करत असल्याची घोषणा केली आहे.

शेतीमध्ये महिलांची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे ‘आयसीएआर’चे महासंचालक एम. एल. जाट यांनी सांगितले. या प्लॅटफॉर्मद्वारे आयसीएआरच्या संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि कृषी विद्यापीठे यांना एकत्र जोडले जाईल. त्यामुळे शेतीतील महिलांसाठी संशोधन, प्रशिक्षण आणि क्षमता विकास कार्यक्रम अधिक बळकट करण्याचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

महिलांना ज्ञान, माहिती आणि निर्णय प्रक्रियेत भूमिका दिल्यास शेतीची उत्पादकता, नफा आणि टिकाऊपणा वाढू शकतो. तसेच परिषदेत झालेल्या चर्चेचे ठोस परिणाम घडवण्यासाठी संस्थांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे जाट म्हणाले.माजी जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी परिषदेत मांडलेल्या शिफारशी सादर करताना कृषी-अन्न मूल्य साखळीत महिला-पुरुष अशा वेगळ्या स्वरूपातील माहिती संकलनाची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे धोरणांची आखणी करताना आकडेवारीचा आधार मिळेल, असे त्या म्हणाल्या.

https://agrowon.esakal.com/agro-special/national-gender-platform-women-farmers-india-rat16

माहिती शेअर करा