येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी) आणि अमेरिकेतील नेब्रास्का विद्यापीठाने सोयाबीन व मका पिकांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित संशोधनासाठी तीन वर्षांचा सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार, बारामती परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत आणखी तीन टप्प्यांचे आयोजन होणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांत ऊस शेतीतील अनेक यशोगाथा निर्माण झाल्या असून, या कार्याची दखल जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क व ‘मायक्रोसॉफ्ट’चे प्रमुख सत्या नडेला यांनी घेतल्याने संस्थेचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे.

हा सामंजस्य करार करताना पार पडलेल्या प्रशिक्षणाच्या प्रारंभी झालेल्या आभासी कार्यशाळेत ‘यूएसडीए-एआरएस (USDA-ARS) अ‍ॅडॅप्टिव्ह क्रॉपिंग सिस्टीम’ प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांना मार्गदर्शन केले. यानंतर नेब्रास्का वॉटर सेंटरचे डॉ. क्रिस प्रोक्टोर, डॉ. जुडे कोबिंग व डॉ. चित्तरंजन राय यांनी मका व सोयाबीन शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.

स्थानिक परिस्थितीनुसार तंत्रज्ञानात बदल केल्यास शेतकऱ्यांना अधिक लाभ कसा मिळू शकतो, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सकारात्मक अनुभव व्यक्त केले. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांनी मार्गदर्शन केले.

https://agrowon.esakal.com/agro-special/ai-agriculture-soybean-maize-research-baramati-training-sai29

माहिती शेअर करा