राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांची किती थकबाकी आहे?. त्यांच्यावर कोणत्या प्रकारची थकबाकी आहे, ही रक्कम किती आहे. याची माहिती घेण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करत आहे. याचा अहवाल साधारणपणे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे. कुठलाही शेतकरी सोसायटीचे कर्ज घेतो, त्याचे वर्षअखेर ३० जून असते.

त्यामुळे ३० जूनपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे कर्जमाफीची घोषणा करतील, असे कृषिमंत्री भरणे यांनी गुरुवारी (दि. ५ मार्च) सांगितले. ते पत्रकाराशी बोलत होते. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. याचदरम्यान कृषिमंत्री भरणे यांनी कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती देत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन योग्यवेळी पूर्ण केले जाईल, असे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते.

जो कोणी खरा गरजू शेतकरी आहे, त्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. कर्जमाफी कशी करायची, यासाठी सरकारची समिती एप्रिलपर्यंत शिफारस करणार आहे. या शिफारशीच्या आधारे पुढच्या तीन महिन्यात म्हणजे ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी याआधी स्पष्ट केले होते.शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय ३० जूनपूर्वी जाहीर करा, अन्यथा १ जुलैपासून राज्यव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/dattatray-bharne-on-farm-loan-waiver-farmer-debt-relief-maharashtra-ddb79

माहिती शेअर करा