सूक्ष्म सिंचन संच बसवून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या अंदाजे ५० हजार शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) अनुदान दिले जाणार असल्यामुळे दिलासा मिळणार आहे.एरवी केवळ कृषी विभागाच्या नियमित योजनेतून अनुदान वाटले जाते. परंतु आता राज्यात ‘पोकरा’चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यातून शेतकऱ्याला वैयक्तिक सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान वाटले जाईल.

कृषी विभागाची पूर्वसंमती मिळालेले; परंतु ‘पोकरा’च्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ‘पोकरा’ने हालचाली सुरू केल्या आहेत. कृषी संजीवनी प्रकल्पाच्या मुख्यालयाने अलीकडेच कृषी आयुक्तालयाला एक पत्र पाठवले आहे.

‘पोकरा’ कार्यक्षेत्रात पूर्वसंमतिपत्रे दिलेल्या अनुदानपात्र शेतकऱ्यांचा तपशील ‘पोकरा’कडे वर्ग करण्याचे या पत्रात सुचविले आहे.आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पोकरामुळे शेतकऱ्यांना ठिबकसाठी अनुदान मिळणे अधिक सुलभ झाले आहे. पहिल्या टप्प्यात १८ हजार शेतकऱ्यांना ९० कोटी रुपयांचे अनुदान ‘पोकरा’कडून अदा होईल. एकूण ५० हजार शेतकऱ्यांना अंदाजे २०० कोटी रुपयांचे अनुदान मिळू शकते.

त्यासाठी ‘पोकरा’च्या कार्यक्षेत्रात पाच हेक्टरच्या आत शेतजमीन तसेच शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक असेल. अशा शेतकऱ्यांचा तपशील टप्प्याटप्याने ‘पोकरा’कडे पाठविला जाईल. अर्थात, महाडीबीटी प्रणालीतून २०२५-२६ मध्ये पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांचीच शिफारस ‘पोकरा’कडे केली जाणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/pocra-micro-irrigation-subsidy-50000-farmers-rat16

माहिती शेअर करा