नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यांतर्गत अकोला जिल्ह्यातील महिला बचत गटांना कृषी व्यवसायात प्रगती साधण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत गावपातळीवर ‘कृषी अवजार बँक’ स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्याच्या ६० टक्क्यांपर्यंत आणि कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक डाॅ. मुरली इंगळे यांनी केले आहे.

या उपक्रमासाठी प्रकल्प गावांमधील ‘उमेद’, माविम पुरस्कृत तसेच इतर महिला बचत गट आणि महिलांचे गाव संघ पात्र राहणार आहेत. लाभ घेण्यासाठी संबंधित गटात वेगवेगळ्या कुटुंबांतील किमान १० सदस्य असणे आवश्यक आहे. तसेच ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला आहे, त्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही.

प्रत्येक गावातून केवळ एका महिला गटालाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थीची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. प्रकल्पाचे मूल्य २० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास राष्ट्रीयीकृत बँकेकडून ७५ टक्के कर्ज घेणे बंधनकारक राहील.निवड झालेल्या गटांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशिन, कंबाईन हार्वेस्टर तसेच फवारणी पंप यांसारखी आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करता येणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/women-shg-tool-bank-subsidy-24-lakh-rat16

माहिती शेअर करा