इस्त्राईल-इराण युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून आखाती देशांत होणारी जलवाहतूक बंद पडल्याने ‘जेएनपीए’ आणि मुंद्रा बंदरात केळीचे शेकडो कंटेनर अडकून पडले आहेत. यामुळे तोंडचे पाणी पळालेल्या निर्यातदारांनी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे धाव घेत सवलती मागितल्या आहेत.सूत्रांच्या म्हणण्यांनुसार, भारतीय केळीला द गल्फ कोऑपरेशन कौन्सिल अर्थात ‘जीसीसी’मधून मोठी मागणी असते.

सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवेत, ओमान आणि बहारीन हे सहा देश सध्या ‘जीसीसी’मध्ये आहेत. मुंबईत अडकून पडलेले अडीचशे कंटेनर याच जीसीसी देशांकडे जाण्याच्या तयारीत होते. मात्र, ‘जेएनपीए’मधून निघाल्यानंतर कंटेनर वाहून नेणाऱ्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या अमेरिका-इस्राईल यांनी इराणविरोधात युद्ध पुकारले आहेत. त्यानंतर इराणने १६७ किलोमीटर लांबीच्या होर्मुझ सामुद्रधुनीतील सर्व सागरी वाहतूक रोखून धरली आहे.

भारतीय केळी निर्यातदार संघटनेच्या (बीएईआय) म्हणण्यांनुसार, केळी निर्यातीसाठी इराणच्या अब्बास बंदराकडे जाणाऱ्या जहाजांमधील जागा यापूर्वी आरक्षित करण्यात आली होती. परंतु, युद्धामुळे जहाजांचेच वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे काही कंटेनर जहाजावर पोचू शकले; जहाजांअभावी तर काही कंटेनर रोखून धरण्यात आले. केळी कंटेनरसाठी अन्य जहाजांचा पर्याय शोधण्याचे प्रयत्न चालू होते. परंतु, तेदेखील थांबविण्यात आले आहेत. या गोंधळात केळीचा दर्जा घसरणार असून निर्यातदारांना मोठे नुकसान होण्याचे संकेत मिळत आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/banana-exporters-approach-central-government-rat16

माहिती शेअर करा