अहिल्यानगर जिल्ह्यात गुरुवारी (ता. १९) रात्री सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान केले आहे. जिल्ह्यातील ४१ गावांत सव्वासात हजार शेतकऱ्यांच्या साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, अहिल्यानगर, पाथर्डी, राहुरी, पारनेर तालुक्यांत बुधवारी (ता. १८) व गुरुवारी (ता. १९) रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काही ठिकाणी गारपीट झाली. पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हासह हरभरा, मका, कलिंगड, खरबुज, आंबा, कांद्याला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील राहुरी, नेवासे, राहाता, अकोले, नगर आणि पाथर्डी तालुक्यांतील ४१ गावातील ७ हजार ३५२ शेतकऱ्यांचे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.
गुरुवारी (ता.१९) जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने काढणीच्या टप्प्यावर आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.अहिल्यानगर तालुक्यातील ५ गावातील ९३० हेक्टरवरील १ हजार ४४५ शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
पाथर्डी तालुक्यातील ४१ गावातील १६० शेतकऱ्यांचे, राहुरी तालुक्यातील ८ गावातील ३५५ हेक्टरवरील ७०० शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिकतर १ हजार ७२६ हेक्टरवरील ४ हजार ३१५ शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांच्या आत असे ५ हजार १५ शेतकऱ्यांचे २ हजार ६१ हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यातील ६ गावात ३८ हेक्टरवरील पिकांचे १९४ शेतकऱ्यांचे आणि राहाता तालुक्यातील ३ गावातील २५ शेतकऱ्यांचे १६.५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/ahilyanagar-unseasonal-rain-crop-damage-farmers-abhi47