दक्षिण कोरियास्थित ‘द एपीईसी क्लायमेट सेंटर’ने (एपीसीसी) नुकत्याच जारी केलेल्या ‘एल निनो वॉच’ या आपल्या मासिक अहवालात येत्या महिन्यांत जगभरात उबदार अवस्था तयार होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे काही प्रदेशांचा अपवाद वगळता जगाच्या बहुतांश भागात तापमान नेहमीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाजही यात व्यक्त करण्यात आला आहे.
यामुळे पाऊसपद्धतींमध्ये (रेनफॉल पॅटर्न) बदल होणे शक्य असून, २०२६ च्या मध्यापर्यंत पॅसिफिक महासागराच्या सान्निध्यात असलेल्या प्रदेशांत अधिक पाऊस पडण्याचा, तर भारतासह नजीकच्या देशांमधील वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज या अहवालातून वर्तविण्यात आला आहे. यामुळे येथील शेती, जलसंपदा आणि हवामानातील स्थैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘एल निनो’ म्हणजे काय?
विषुववृत्ताजवळ मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात होणारी वाढ म्हणजे एल निनो. यामुळे उष्णकटिबंधीय वातावरणीय प्रवाह, वाऱ्यांच्या पद्धती, हवेचा दाब आणि पावसाचे वितरण यांत कमालीचे बदल संभवतात. भारतातील बहुतांश पावसासाठी कारणीभूत असणाऱ्या नैर्ऋत्य मॉन्सूनवर ‘एल निनो’मुळे परिणाम होतो. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवते.
२०२३ या वर्षी जूनमध्ये ‘एल निनो’स प्रारंभ झाला. ही स्थिती सुमारे ११ महिने टिकली. याचा परिणाम देशातील धान्य उत्पादनावर झाला. त्या वर्षी वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन कमालीचे घटले होते. त्यामुळे अन्नधान्यांच्या किमतींतही वाढ झाली होती.
या अहवालानुसार, दक्षिण हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीपेक्षा पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता आहे. उत्तर पॅसिफिक महासागराचा मध्य ते पश्चिम भाग, विषुववृत्तापलीकडील पूर्व उत्तर पॅसिफिक महासागर आणि उष्ण कटिबंधीय पश्चिम अटलांटिक महासागरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
https://agrowon.esakal.com/weather-news/el-nino-impact-global-weather-climate-change-rat16