पेट्रोलमधील इथेनॉल ब्लेंडिंगची सध्याची २० टक्क्यांची मर्यादा वाढवून ती ३० टक्क्यांवर नेण्यात यावी, असे आवाहन ‘ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन’ (एआयडीए) या इथेनॉल उत्पादक व डिस्टिलरींच्या शिखरसंस्थेने केंद्र सरकारला केले आहे.

मध्यपूर्वेतील युद्धामुळे विस्कळीत झालेल्या खनिज तेलपुरवठ्याच्या पार्श्‍वभूमीवर हा उपाय योग्य ठरणार असल्यामुळे सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही संघटनेने केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना यासंदर्भात संघटनेने पत्र पाठविले आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, टप्प्याटप्प्याने इथेनॉल ब्लेंडिंग वाढविल्यास कच्च्या खनिज तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व आणि खर्च कमी करता येईल. आपण २० टक्के ब्लेंडिंगचे उद्दिष्ट मुदतीआधीच गाठले होते.इथेनॉल उद्योग आणि सरकारी धोरणांतील समन्वय यामुळे ही गोष्ट शक्य झाली. आता मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर आमची २० टक्क्यांहून अधिक इथेनॉल उपलब्ध करून देण्याची तयारी आहे.

फ्लेक्स-फ्युएल वाहनांची शिफारस

ब्राझीलप्रमाणे भारतातही १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय धोरण आखावे, अशी शिफारसदेखील ‘एआयडीए’ने केली आहे. फ्लेक्स-फ्युएल वाहनांच्या इंजिनांमध्ये नेहमीच्या इंधनासोबतच इथेनॉल अथवा मिथेनॉलचा पूर्णांशाने वापर करण्याची क्षमता असते.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/ethanol-blending-30-percent-demand-india-rat16

माहिती शेअर करा