सातारा जिल्ह्यातील शेती अधिक स्मार्ट, अचूक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने सातारा जिल्ह्याने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. जिल्हा नियोजन समिती आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नावीन्यपूर्ण आधुनिक फळबाग उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित फळबाग विकास प्रकल्प’ योजनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित युनिट्सच्या स्थापनेला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या प्रायोगिक प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील सुमारे ७२५ हेक्टर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळबागांचे व्यवस्थापन केले जाणार आहे.
कृषी विभागाकडून यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना फळपिकांची स्थिती, हवामानातील बदल, मातीतील ओलावा, तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव याबाबत रिअल-टाइम माहिती उपलब्ध होणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळणाऱ्या विश्लेषणामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर, खत व औषधांच्या खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे या प्रकल्पाबाबत माहिती देताना म्हणाल्या, ‘‘एआय आधारित यंत्रणेमुळे पिकांचे सतत निरीक्षण करणे आणि अचूक निर्णय घेणे शक्य होणार आहे. विशेषतः उच्च मूल्य असलेल्या फळपिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/ai-based-orchard-project-rat16