आसामच्या गुवाहाटी येथे स्पायसेस अँड क्युलिनरी हर्ब्स (CCSCH) कोडेक्स समितीचे आठवे अधिवेशन नुकतेच पार पडले. या माध्यमातून भारताने जागतिक मसाले क्षेत्रात आपले नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले. स्पायसेस बोर्डने आयोजित केलेल्या या अधिवेशनात २७ देशांतील सुमारे ८१ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) चे सीईओ रजित पुन्हानी यांनी सांगितले की, २०२४ मध्ये जगातील मसाले उद्योगाची उलाढाल २८.५ अब्ज डॉलर्स एवढी होती. हा उद्योग २०३३ पर्यंत ४१.९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यांनी यावेळी बोलताना ग्राहकांच्या सुरक्षिततेची खात्री आणि समतोल जागतिक व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान आधारित आणि सुसंगत अन्न मानकांच्या गरजेवर भर दिला.
स्पायसेस बोर्डच्या सचिव पी. हेमलता यांनी, जागतिक अन्न व्यापारात प्रामाणिकपणा आणि सुरक्षितता राखण्यात कोडेक्स समिती महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद केले. या फ्रेमवर्कमुळे उत्पादक, व्यापारी आणि ग्राहक या सर्वांनाच फायदा होईल. यामुळे मसाले उद्योगात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शाश्वतता वाढेल, असे त्या म्हणाल्या.