वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेत १२ आणि २८ टक्क्यांचे जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेत घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (ता.३) दिली आहे. त्यामुळे आता ५ आणि १८ टक्के हे दोनच जीएसटी स्लॅब राहणार आहेत.
शेती अवजारे, कीटकनाशक आणि सिंचन आदी वस्तूंवरील जीएसटी ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी, ग्राहक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार असून २२ सप्टेंबरपासून नवीन कर प्रणाली लागू होणार आहे.
नवी दिल्लीत ३ आणि ४ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कृषी उत्पादनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून आता ५ टक्के करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वापरातील विविध वस्तूंवरील कर रचनेत बदल करण्यात आला आहे. तर दैनंदिन वापराच्या काही वस्तूंवरील जीएसटी शुन्य करण्यात आला आहे. तसेच ४० टक्क्यांचा नवीन स्लॅबही तयार करण्यात आला आहे.