देशभरात दुधातील भेसळीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) स्वतंत्र दूध उत्पादक व विक्रेत्यांसाठी नोंदणी किंवा परवाना बंधनकारक केला आहे. सहकारी दुग्ध संस्थेचे सदस्य नसलेल्या सर्व दूध उत्पादकांना तसेच दूध विक्रेत्यांना अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू ठेवण्यासाठी प्राधिकरणाकडे वैध नोंदणी किंवा परवाना घेणे आवश्यक असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. किरकोळ उत्पादक किंवा विक्रेत्यांबाबत याची कशी अंमलबजावणी होणार हे स्पष्ट नाही.
११ मार्च रोजी काढलेल्या आदेशात प्राधिकरणाने म्हटले आहे की, अनेक दूध उत्पादक व विक्रेते कोणतीही नोंदणी न करता दूध विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. या निर्देशांनुसार सहकारी संस्था कायद्यांतर्गत नोंदणीकृत दुग्ध सहकारी संस्थेचे सदस्य आणि आपले संपूर्ण दूध सोसायटीला पुरवणारे उत्पादक वगळता इतर सर्व दूध उत्पादक व विक्रेत्यांना नोंदणी करावी लागणार आहे.
प्राधिकरणाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विशेष नोंदणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. नियुक्त अधिकारी, केंद्रीय परवाना अधिकारी आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दूध उत्पादक व विक्रेत्यांकडे वैध नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना आहे का, याची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/women-shg-tool-bank-subsidy-24-lakh-rat16