भारताने न्यूझीलंडसोबत केलेल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीतून डेअरी, सोयाबीन, मक्यासह इतर शेतीमाल, भाजीपाला यांना वगळण्यात आले आहे. न्यूझीलंडने भारताच्या कापड, तयार कपडे, चर्मोद्योग आणि सागरी उत्पादनांसह इतर वस्तुंच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. तर भारताने वाईन, अवोकॅडो, ब्लूबेरीज आयातीवरील शुल्क कमी केले असून मध, सफरचंद, किवीच्या शुल्कमुक्त आयातीचा कोटा ठरवून दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात मुक्त व्यापार करारासंदर्भात दूरध्वनीवरून चर्चा झाल्यानंतर वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी हा करार मार्गी लागल्याची औपचारिक घोषणा केली. भारत शेती आणि डेअरीची बाजारपेठ खुली करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारतातून निर्यात होणाऱ्या शेतीमालासह कोणत्याच मालावर न्यूझीलंडमध्ये शुल्क लागणार नाही. त्यामुळे भारतातून कापड, तयार कपडे, सागरी उत्पादने, पादत्राणे, इंजिनियरिंग वस्तु तसेच ऑटोमोबाईल निर्यातीला चालना मिळणार आहे. तर न्यूझीलंडच्या लोकर, कोळसा आणि लाकडांच्या आयातीवर भारत कोणतेही शुल्क आकारणार नाही. वाईन, अवोकॅडो, ब्लूबेरीज आयातीवरील शुल्क कमी करण्यात येईल आणि किवी, सफरचंद आयातीवरील शुल्क कपात करताना कोटा ठरवला जाईल. कोट्यापेक्षा जास्त आयातीवर शुल्क लागू होणार आहे. पण या आयात शुल्कातही ५० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/agriculture-dairy-protected-in-free-trade-agreement-rat16

माहिती शेअर करा