देशातून २०२४-२५ मध्ये इथेनॉल तयार करण्यासाठी १२५ लाख टन मक्याचा वापर करण्यात आला आहे. गेल्या इथेनॉल आर्थिक वर्षात मक्यावर आधारित इथेनॉलचा ४७७ कोटी लिटरचा पुरवठा तेल कंपन्यांना करण्यात आला असून, इथेनॉल निर्मितीसाठी मका हा सर्वाधिक कच्चा माल म्हणून पुढे येत आहे. २०२४-२५ मध्ये मक्याचे देशातील उत्पादन ४३४ लाख टन इतके झाले. इथेनॉलसह कुक्कुटपालन व पशुखाद्यासाठी मक्याचा वापर केला जात आहे.

इथेनॉल निर्मितीसाठी मक्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तांदळाचा कोंडा, तुकडा तांदूळ, बाजरी आणि गव्हाचा कोंडा यासारख्या देशांतर्गत उपलब्ध पर्यायी घटकांचाही वापर करत असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असला, तरी मक्याची टंचाई देशात कुठेही नसल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. कच्च्या मालाचा आधार अधिक वैविध्यपूर्ण करण्यासाठी सरकार गोड ज्वारीसारख्या पर्यायी पिकांच्या व्यवहार्यतेचाही अभ्यास करत असले तरी अद्याप म्हणाव्या त्या प्रमाणात या ज्वारीची लागवड होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

मका उत्पादन वाढीसाठी प्रयत्न

मका उत्पादन वाढावे यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानअंतर्गत सुधारित व संकरित बियाणे, खत व्यवस्थापन, कीडनियंत्रण व यांत्रिकीकरणासाठी अनुदान दिले जात आहे. कोरडवाहू व मध्यम पर्जन्यमान असलेल्या भागात मका लागवडीस विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. आयसीएआर व कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे, दुष्काळसहिष्णू वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात आहेत. कृषी विज्ञान केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना लागवड, खत-पाणी नियोजन व काढणीपश्चात प्रक्रियेबाबत प्रशिक्षणही दिले जात आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/corn-emerges-as-key-raw-material-for-ethanol-production-in-india-sai29

माहिती शेअर करा