राज्यातील शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्यात येणाऱ्या अडचणींचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कृषी विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विभागाकडून अधिकृत सिम कार्ड देण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकारी बदलला तरी तोच संपर्क क्रमांक वापरता येणार आहे, ज्यामुळे त्यांच्या संवादात सातत्य राहील आणि माहिती देण्यात विलंब होणार नाही.
अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी संपर्क क्रमांक
शेतकऱ्यांकडून अनेकदा अशी तक्रार येत होती की, अधिकारी फोन उचलत नाहीत, बदलीनंतर संपर्क क्रमांक बदलतात, त्यामुळे त्यांना योजनांची माहिती मिळत नाही किंवा मार्गदर्शनासाठी अडचणी येतात. ही समस्या लक्षात घेऊन विभागाने “एक अधिकारी, एक नंबर” ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांना विभागाकडून सिम कार्ड देण्यात येईल आणि अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतरही तोच नंबर त्या पदावर येणाऱ्या नव्या अधिकाऱ्याला देण्यात येईल. अशा प्रकारे प्रत्येक पदासाठी एक स्थिर संपर्क क्रमांक निश्चित केला जाईल.