मृगबहारातील संत्र्यांची कळमना बाजारात रोज सरासरी ४० क्विंटलची आवक होत आहे. दरम्यान, खरेदीदारांची मागणी आणि उपलब्धता यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. परिणामी, चांगल्या प्रतीच्या संत्र्यांना ७२ हजार रुपये आणि सामान्य दर्जाच्या संत्र्यांनाही ५२ हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे
महत्त्वाचे म्हणजे, बाजारात ज्या प्रमाणात खरेदीदार उभे आहेत, त्या तुलनेत फळांचा पुरवठा अत्यंत मर्यादित आहे. केरळसह दक्षिण भारतातून पोंगलच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या दर तेजीत असल्याचे नव अनंत शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक राकेश मानकर यांनी सांगितले. फळांचा लॉट बाजारात उतरल्याक्षणी बोली लागत आहे.
संत्रा बाजारात दर कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नव्या आवकेची गरज असते; मात्र सध्या ती परिस्थितीच नाही. बागांमध्ये उपलब्ध फळे मर्यादित असून जे काही उत्पादन आहे ते आधीच व्यापाऱ्यांच्या नजरेत आहे. त्यामुळे बाजारात ‘ओव्हरसप्लाय’ होण्याची शक्यता नसल्याने भाव दबावाखाली येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
https://agrowon.esakal.com/market-intelligence/orange-price-at-rs-72000-per-ton-rat16