डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञांनी पॉलिहाउस आणि शेडनेटमधील कार्बन डायऑक्साइड वायू, आर्द्रता आणि सूर्यप्रकाशाचे प्रमाण दर्शविणारे उपकरण विकसित केले असून त्याचे पेटंट मिळाले आहे. या उपकरणामुळे हवेतील वायू, सूर्यप्रकाशाची तीव्रता, आर्द्रता तपासता येणार आहे. तसेच त्यानुसार उपाययोजना करणे सोपे जाणार आहे.
हे उपकरण स्मार्ट सेन्सर प्रणाली आणि स्वयंचलित नियंत्रण तंत्रज्ञानावर आधारित असून संरक्षित शेतीमध्ये वापरण्यास उपयुक्त ठरणार आहे. त्यानुसार पिकांची चांगली वाढ व गुणवत्ता सुधारण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होईल.