राज्यात सूक्ष्म सिंचन योजनेत सहभागी झालेल्या ५१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच १७८ कोटी रुपयांच्या आसपास अनुदान रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.‘‘केंद्राच्या दुसऱ्या हप्त्याची आम्ही वाट पाहत होतो, तो आता मिळाला आहे. यात ४० टक्के राज्य सरकारच्या हिश्‍श्याचे म्हणजे ७२ कोटी रुपये जमा होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात फेब्रुवारीअखेरपर्यंत एकूण १७८ कोटी रुपये अनुदानापोटी जमा होण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

केंद्राच्या ‘प्रति थेंब जास्त पीक’ या योजनेत २०२५-२६ या आर्थिक वर्षात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकूण २८६ कोटी रुपये देण्याचे राज्य सरकारला कळविले होते. त्यानुसार १५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता यापूर्वीच मिळाला होता. आता १०६ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर झाला आहे.मात्र, त्यातील ११.६६ कोटी रुपये अनुसूचित जाती प्रवर्गातील व ९.२४ कोटी रुपये आदिवासी म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना वाटपाचे बंधन केंद्र सरकारने टाकले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, केंद्राचा दुसरा हप्ता मिळाल्याने फेब्रुवारीअखेर राज्यातील किमान ५१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान रक्कम जमा झालेली असेल.

हा निधी खर्च होताच ठिबकसाठी उर्वरित दहा टक्के हप्ता म्हणजे आणखी ३२ कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्राकडे निधी असल्यास अजून १३० कोटी रुपये मिळू शकतील. त्यामुळे भविष्यात एकूण १६२ कोटी रुपये सूक्ष्म सिंचनासाठी उपलब्ध होऊ शकतात.आतापर्यंत २५७ कोटींचे वाटप राज्यातील ५८ हजार शेतकऱ्यांना ठिबक संच अनुदानापोटी चालू वर्षात आतापर्यंत २५७ कोटी रुपये वाटप झाले आहेत. केंद्रीय निधीशिवाय राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून देखील अनुदान वाटप केले जात आहे. या योजनेतून दोन महिन्यांपूर्वीच १०० कोटी रुपये राज्य सरकारने कृषी आयुक्तालयाकडे पाठवले होते.

https://agrowon.esakal.com/agro-special/178-crores-will-be-provided-for-micro-irrigation-rat16

माहिती शेअर करा