आंबा, संत्रा आणि काजू पीक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या विमा योजनेतील पडताळणी प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना सहभाग घेता आला नव्हता. त्यामुळे या विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील सर्व अधिसूचित जिल्ह्यांसाठी अंतिम मुदत वाढविण्याबाबत केंद्र सरकारशी कृषी विभागाने पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल घेऊन आंबा, काजू, संत्रा पीक उत्पादक शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली आहे.
विमा कंपन्यांचा आढावा घेतल्यानंतर बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि जनरल सेंट्रल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी या मुदतवाढीस मान्यता दिली आहे. युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी एनसीआयपी पोर्टल सुरू झाल्यापासून पुढील सात दिवसांची मुदतवाढ लागू करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यापैकी एआयसी ऑफ इंडिया लिमिटेड यांनी त्यांच्या क्लस्टरमधील जिल्ह्यांसाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे.