तापमानातील वाढ, अतिवृष्टी, सतत ढगाळ हवामान अशा बदलत्या हवामानामुळे संत्रा पट्ट्यात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून फळगळती होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असला तरी संशोधक संस्थांना या प्रश्नाचे समाधान शोधता आले नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
राज्यातील संत्र्याखालील एकूण दीड लाख हेक्टर पैकी सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. वरुड, मोर्शी या तालुक्यांची त्यात आघाडी आहे. परंतु गेल्या काही वर्षांत या भागात कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागत बागा सुकण्याचे प्रमाणही अधिक आहे. फळगळतीमुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संदर्भाने मंगेश देशमुख सांगतात, गेल्या दहा वर्षांपासून आम्ही याच मुद्यावर संशोधनाची मागणी करीत आहोत.
इतकेच नाही तर संशोधनाकामी दोन एकर शेती द्यायला तयार आहोत. परंतु आमच्या या समस्येबाबत केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अशा दोन्ही यंत्रणा संशोधनाच्या बाबतीत सकारात्मक नाहीत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत या समस्येचे समाधान त्यांना शोधता आले नाही.