दरवर्षी नवरात्रोत्सवात उत्तर भारतात द्राक्षांची मागणी असल्याने कसमादे भागात अर्ली द्राक्ष बागांचे खुडे सुरू होतात. मात्र मे महिन्यापासून पाऊस सुरू असल्याने यंदाच्या हंगामावर परिणाम आहे. परिणामी जवळपास तीन आठवडे उशिराने खुडे सुरू झाल्याचे चित्र आहे. उत्पादनावर परिणाम आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला उच्चांकी दर मिळाले आहेत. सफेद वाणास प्रति किलो १२० ते १६० तर काळया द्राक्षांना १६० ते २१० रुपयांपर्यंत प्रतवारीनुसार दर मिळाले आहेत. आतापर्यंतच्या देशांतर्गत बाजारासाठी होणाऱ्या सौद्यांमध्ये अर्ली द्राक्षांचे दर यंदा उच्चांकी निघाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
‘अधिक जोखीम अधिक दर’ हे अर्ली द्राक्ष हंगामाचे सूत्र असून शेतकरी जोखीम घेऊन जूनअखेरपासून गोडी बहर छाटण्यांना सुरुवात करतात. मात्र २०१९ पासून नैसर्गिक आपत्तीचे दुष्टचक्र असल्याने शेतकऱ्यांनी छाटणी काहीशी पुढे जात आहे. काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी गुंतवणूक करून क्रॉपकव्हर पद्धतीचा अवलंब केल्याने नुकसान टळले आहे. अशा काही प्रतिनिधी शेतकऱ्यांचे सध्या खुडे सुरू आहेत. मात्र ज्यांचा माल तयार आहे किंवा पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहे, अशा बागांवर आच्छादन नसल्याने नुकसान समोर आले आहे. मात्र जेथे क्रॉपकव्हरमुळे द्राक्ष वाचलेली व त्याची गुणवत्ता आहे, अशा मालाला उठाव असून उच्चांकी दर आहेत.