कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेतीशाळेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपरिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत राज्याकरिता “हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान सुरू केले आहे. हे अभियान शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाबरोबरच, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग या यंत्रणादेखील सहभागी होत आहेत. या अभियानाचा एक टप्पा म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळा आयोजित करण्यात येत आहेत. शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बिजोत्पादक,फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक व शेतकरी गट, वनपट्टे धारक या सर्वांनी मोठ्या संख्येने डिजिटल शेती शाळांना जॉईन व्हावे, असे आवाहन कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत करण्यात आले आहे.