राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने अनेक ठिकाणी पारा ४३ अंशांच्या वर गेला आहे. आज (ता. २) उन्हाची ताप कायम राहण्याबरोबरच पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
नैर्ऋत्य राजस्थानात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते केरळपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राजस्थानमधील बारमेर येथे देशातील उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे.
गुरूवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढल्याने चंद्रपूर आणि अमरावती येथे ४४ अंशांपेक्षा अधिक, सोलापूर, जळगाव, धुळे, जेऊर, परभणी आणि वर्धा येथे ४३ अंशांपेक्षा अधिक, तसेच वाशीम, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि ब्रह्मपुरी येथे ४२ अंशापेक्षा अधिक, तर बुलढाणा, नागपूर आणि यवतमाळ येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.
आज (ता. २) राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहणार असून, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.
https://agrowon.esakal.com/weather-news/thunderstorms-forecast-in-east-vidarbha-rat16#goog_rewarded