आगामी खरीप हंगामात लागवडीच्या अनुषंगाने बाजारपेठेत बियाण्यांची लगबग लवकरच सुरू होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच प्रतिबंधित असलेली एचटीबीटी दाखल झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांत लगतच्या अमरावती जिल्ह्यात दोन ठिकाणी असे बियाणे पकडण्यात आले आहे. अकोल्यात मात्र, अद्याप कारवाईचा मुहूर्त निघालेला नाही. दुसरीकडे असे बियाणे दाखल झाल्याचा संशय असून प्रतिपाकीट १२०० रुपयांपर्यंत याची विक्री सुरू झालेली असल्याचे सांगितले जाते.

भारतात अद्याप एचटीबीटी बियाण्याच्या वापरावर केंद्र सरकारने कायदेशीर बंदी घातली आहे. यासाठी पर्यावरणावर दुष्परिणाम होण्याची भीती सांगितली जाते. तसेच, या बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होण्याचा धोका असून, त्याचे दीर्घकालीन परिणाम शेतीच्या उत्पादनक्षमतेवर होऊ शकतात, असेही बोलले जाते. मात्र दुसरीकडे गेल्या काही हंगामांपासून तणनाशकांचा वापर करता येणारे कपाशीचे असे वाण सर्रास लागवड केली जात आहेत. काही जण या वाणांच्या वापराचे खुलेआम समर्थनही करू लागलेले आहेत.

सध्या शेतीच्या कामांसाठी मजूर मिळेनासे झाल्याने तसेच खर्च वाढत असल्याने शेतकरी या बियाण्यांना पसंती देत आहेत. लागवडीनंतर तणनाशकाचा वापर सहज होऊ शकत असल्याने अशा प्रकारच्या बियाण्यांची मागणी वाढत आहे. हा सर्व व्यवहार छुप्या पद्धतीने होत असून, या व्यवहारासाठी कुठलीही अधिकृत पावती शेतकऱ्याला दिली जात नाही.

काही गावात एजटांच्या माध्यमातून हा व्यवहार फोफावत चालला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, अकोट या तालुक्यांमध्ये सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी मे महिन्याच्या अखेरीस, जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड करीत असतात. प्रतिबंधित असलेले हे बियाणे बेकायदेशीररीत्या वाढीव दराने शेतकऱ्यांना विकण्यासाठी एजंटांच्या साखळ्या कामाला लागलेल्या आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/prohibited-htbt-reaches-the-border-with-clandestine-trade-rat16#goog_rewarded

माहिती शेअर करा