कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानासाठी निवड झालेल्या शेतकऱ्याला त्याने मागील पाच वर्षांत लाभ घेतलेल्या घटकासाठी पुन्हा लाभ न देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.या निर्णयासंदर्भात अधिक माहिती देताना एका विभागीय कृषी सहसंचालकाने सांगितले, की कृषी आयुक्तालयाने दुबार लाभ टाळण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या होत्या. परंतु, काही जिल्ह्यांमधून त्याच त्याच घटकांसाठी अनुदानाचे प्रस्ताव पुन्हा मंजूर होण्याची शक्यता होती. त्यामुळे क्षेत्रीय पातळीवरील संभ्रम दूर करण्यासाठी कृषी अभियांत्रिकी संचालनालयाने नव्याने आदेश जारी केले आहेत.
कृषी यांत्रिकीकरण योजनेतून एका लाभार्थ्याची निवड कोणत्या तरी एकाच घटकाकरिता करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनुदान वाटपातील द्विरुक्ती टाळण्यासाठी दक्षता घ्यावी. मागील पाच वर्षांमध्ये संबंधित शेतकऱ्याने एखाद्या घटकाचा लाभ घेतला असल्यास त्याच घटकाकरिता त्याच लाभार्थ्याची पुन्हा निवड झालेली असल्यास अनुदान प्रस्ताव मंजूर करू नये, अशा स्पष्ट सूचना संचालनालयाने दिल्या आहेत.
यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानासाठी संकेतस्थळावर अर्ज दाखल करताना शेतकऱ्याने अपलोड केलेल्या कोटेशनप्रमाणेच यंत्र किंवा अवजार खरेदी करणे आवश्यक असेल, असेही संचालनालयाने म्हणणे आहे. मात्र, अपवादात्मक स्थितीत संबंधित शेतकरी दुसरे यंत्र किंवा अवजार खरेदी करण्याची मागणी करू शकतात. या बदलाकरिता उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची मान्यता बंधनकारक असेल. परंतु, ही प्रक्रिया राबविण्याच्या गोंधळात शेतकऱ्याला पूर्वसंमतिपत्र देण्यास उशीर होऊ शकतो.