देशातील डिजिटल व्यवहार अधिक सुलभ, पारदर्शक आणि व्यापारी-अनुकूल करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन’ने (ऑल इंडिया) केंद्र सरकारकडे केली आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून या संदर्भातील विविध सूचना मांडल्या आहेत.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेमुळे देशात ऑनलाइन व्यवहारांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असला, तरी व्यवहारातील पारदर्शकतेबाबत अजूनही काही अडचणी जाणवत आहेत.

विशेषतः आयएमपीएस किंवा फोनपे यांसारख्या माध्यमांतून पैसे प्राप्त झाल्यानंतर अनेक वेळा पाठविणाऱ्याचे पूर्ण नाव किंवा मोबाइल क्रमांक स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे व्यवहारात संभ्रम निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक ऑनलाइन व्यवहारात पाठवणाऱ्याची संपूर्ण ओळख दिसणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच, डिजिटल अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठी बँकिंग सेवा वर्षभर सुरू ठेवण्याचा प्रस्तावही संस्थेने मांडला आहे. बँकांच्या सुट्ट्यांचे पुनर्गठन करून ‘रोटेशन पद्धती’ लागू केल्यास बँका वर्षातील ३६५ दिवस कार्यरत राहू शकतील, अशी भूमिकादेखील ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनने घेतली आहे. यामुळे व्यवहारातील अडथळे कमी होऊन आर्थिक व्यवहार अधिक गतिमान होतील, तसेच रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/digital-transactions-transparency-agro-dealers-rat16

माहिती शेअर करा