आंबा शेतकऱ्यांना विक्रीसंदर्भात अनेक पर्यंत उपलब्ध आहेत. डिजिटल तंत्राद्वारे विक्रीची गरज आहे. कोणत्या देशात आंब्याला मागणी आणि चांगला दर मिळेल याची माहिती या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्याला कळेल आणि त्याचा फायदा होईल. या तंत्रज्ञानासाठी परदेशांवर अवलंबून राहून चालणार नसल्याचे मत रसायनशास्त्र तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलपती प्रा. जे. बी. जोशी यांनी व्यक्त केले.

मुंबई येथील आयसीटी येथे बुधवारी (ता. १) महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने हवामान बदल, कृषी फलोत्पादन, सेंद्रिय सिंचन, मार्केटिंग फूड, गुंतवणूक, सौरऊर्जा विषयावरील परिषदेत ते बोलत होते. प्रा. जोशी यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन केले. या वेळी राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल स्वागताध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून आयसीटीचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित, जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटीच्या वाहतूकचे मुख्य व्यवस्थापन गिरीश थॉमस उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, की तंत्रज्ञानाबाबत आपण परदेशांवर अवलंबून आहे. अनेक कारखाने आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात परदेशातून भरपूर गोष्टी आणतो आणि केवळ आपल्या देशात जोडणी करतो. यामुळे आपण ज्ञानाच्या क्षेत्रात परदेशावर अवलंबून राहतो. हेच आपल्या गरिबीचे कारण आहे. मी आतापर्यंत बांबू, ऊस आणि सोयाबीनसारख्या शेतीपिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी संशोधन केले. परंतु आतापर्यंत आंब्याचे उत्पादन वाढवण्याच्या विषयाला हात घातला नाही. परंतु यापुढे या क्षेत्रात काम करून उत्पादनवाढीसाठी काम करेन.

https://agrowon.esakal.com/agro-special/digital-technology-mango-sales-farmers-india-abhi47

माहिती शेअर करा