राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रात सरकारी अनुदानापोटी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ८६० कोटी रुपये जादा आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दीड लाखाहून अधिक कृषी अवजारे खरेदी करता आली, असे निरीक्षण कृषी आयुक्तालयाने नोंदविले आहे.यासंदर्भातील कृषी आयुक्तालयाच्या अहवालानुसार, मजूर टंचाई ही शेतीमधील सध्याची सर्वांत किचकट समस्या समजली जात आहे. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणाला चालना देणे, हाच एकमेव उपाय असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध योजना लागू केल्या आहेत.
कृषी यांत्रिकीकरण योजनांमध्ये २०२५-२६ मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना वाटपासाठी एक हजार १२१ कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. गेल्या वर्षी मिळालेल्या अनुदानाच्या तुलनेत हा निधी ८६० कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा एक लाख ६० हजार सुधारित कृषी अवजारे घेता आली. यामुळे शेतीमाल उत्पादन वाढीबरोबरच कृषियंत्रे व अवजारे उत्पादन क्षेत्राच्या व्यवसाय वृद्धीला चालना मिळाली आहे, असे बाजारपेठेतील तज्ज्ञांचे मत आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/farm-machinery-subsidy-increase-860-crore-rat16