पीक कर्जासाठी सात-बारा उताऱ्याची आवश्यकता असताना भूमी अभिलेख विभागाची वेबसाइट ३० मार्चपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोर्टल अपग्रेडेशनच्या नावाखाली ही सेवा ठप्प असून मंगळवारपर्यंत (ता. ७) पूर्ण दुरुस्ती होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही सेवा सुरळीत झाली नसल्याने पीककर्ज वितरण प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.
मार्चअखेर पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्यासाठी सात-बारा उताऱ्याची आवश्यकता असते. मात्र, वेबसाइट बंद असल्याने शेतकऱ्यांना सात-बारा मिळत नसल्याने कर्ज प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. ३१ मार्चपूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँकांकडून सुमारे ५० हजार शेतकऱ्यांनी ४०० कोटी रुपयांच्या पीककर्जाची परतफेड केली आहे. त्यामुळे नव्या कर्जासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज होण्याची अपेक्षा असताना प्रक्रिया ठप्प झाली आहे.
दरम्यान, पोर्टलच्या दुरुस्तीचे काम ५ एप्रिलपासून सुरू असून सातबारा, आठ-अ, फेरफार, नोंदी आणि म्युटेशनशी संबंधित सेवा बंद आहेत. ७ एप्रिलपर्यंत सेवा सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. यामुळे सेवा केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढली असून कामकाज ठप्प झाल्याचे चित्र आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/land-records-website-down-crop-loan-issue-rat16