देशात एचटीबीटी कापूस, मका व सोयाबीन या पिकांबाबत केंद्र सरकारचे धोरण अनिश्चित असल्याने शेती संकटात सापडली आहे, असा आरोप करत शेतकरी संघटनेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले. यामध्ये तणनाशक सहनशील व कीडप्रतिरोधक वाणांना मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
भारतामध्ये अधिकृतपणे केवळ बीटी कापसालाच परवानगी असली, तरी मागील १५ वर्षांपासून तणनाशक सहनशील व कीडप्रतिरोधक एचटीबीटी कापसाची अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे.नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, देशातील कापसाची उत्पादकता सुमारे ४५० किलो प्रति हेक्टर असून जागतिक सरासरी ७५० किलो प्रति हेक्टर आहे. २००६ नंतर कापूस बियाणे तंत्रज्ञानात अपेक्षित संशोधन झाले नसल्याने उत्पादनवाढ ठप्प असल्याचेही नमूद करण्यात आले.
दरम्यान, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या जबलपूर येथील तण संशोधन संचलनालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात तणांमुळे पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले आहे. हरभरा (१०-५० टक्के), कापूस (४०-६० टक्के), मका (३०-४०टक्के), सोयाबीन (१०-१०० टक्के), तांदूळ (१०-१०० टक्के) यांसह अनेक पिकांमध्ये तणांमुळे उत्पादनात मोठी घट होत असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/land-records-website-down-crop-loan-issue-rat16