पारंपरिक पिकांच्या तुलनेत फळशेती अधिक फायदेशीर ठरते, असा सर्वसाधारण समज असला तरी यंदा हा समज धुळीस मिळाल्याचे चित्र आहे. कलिंगड, खरबूज आणि केळी या प्रमुख फळपिकांना सध्या अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सध्या केळीला केवळ २५० ते ७२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, उच्च प्रतीच्या केळीचाही दर मर्यादितच राहिला आहे. दुसरीकडे, उन्हाळ्यात मोठी मागणी असणाऱ्या कलिंगडालाही अपेक्षित दर मिळत नसून प्रति क्विंटल २०० रुपयांपासून ६०० ते ७०० रुपयांदरम्यानच व्यवहार होत आहेत. खरबुजाची परिस्थिती आणखी बिकट असून ते प्रति क्विंटल एक हजार रुपयांपेक्षा कमी दरात विकले जात आहे.
यंदाच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने कलिंगड व खरबुजाच्या वेली वाळून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा लागवड करावी लागली. त्यातून उत्पादन सुरू होताच बाजारभाव कोसळल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे. तसेच पश्चिम आशियात इराण आणि अमेरिका-इस्राईलमध्ये सुरू असलेली युद्धाची धुमश्चक्रीदेखील भावघसरणीला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे
https://agrowon.esakal.com/market-intelligence/fruit-crop-low-prices-farmers-crisis-rat16