अवकाळी पावसाने शेतपिकांचे नुकसान झालेल्या ९ जिल्ह्यांतील ६६ हजार ३१२ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर २०२५ ते नोव्हेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ ते मार्च २०२६ या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ५३ कोटी ७३ लाख ७ हजार इतका निधी वितरणास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे.

विभागीय आयुक्त नागपूर, पुणे, अमरावती आणि संभाजीनगर यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुषंगाने शासनाने निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी (दि. १६ एप्रिल) महसूल विभागाकडून जारी करण्यात आला

राज्यातील गोंदिया, वर्धा, सोलापूर, सातारा, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने एकूण ४९ हजार ५११ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले होते. अवकाळी पावसाचा नागपूर विभागातील गोदिंया आणि वर्धा जिल्ह्यातील १,५०४ शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यांचे ६६५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पुणे विभागातील सोलापूर, सातारा जिल्ह्यात ४,५६४ शेतकरी बाधित आहेत. त्यांचे २,९६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले.

अमरावती विभागातील बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यातील एकूण ५१,७२९ शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यातील एकूण ८,५१५ शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-unseasonal-rain-relief-53-crore-farmers-compensation-ddb79

माहिती शेअर करा