मुदखेड, बारड आणि अर्धापूर महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा अखेर मंजूर झाला आहे. या मंडळांसाठी उच्च व निम्न तापमानाची भरपाई म्हणून एकूण हेक्टरी ७४ हजार ६७८ रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

गतवर्षी जून महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि वादळी वार्‍यामुळे या तीनही मंडळातील सुमारे ४ हजार हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे सलग पाच दिवस प्रतिकूल तापमानामुळेही शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र तापमानाची नोंद असूनही विमा कंपनीकडून तांत्रिक कारणास्तव शेतकर्‍यांचे दावे फेटाळले जात होते.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, या शेतकऱ्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांची भेट घेऊन या विषयाशी त्यांना अवगत केले. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा केली.तसेच विधानसभेत व राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. शेतकरी प्रतिनिधी तथा नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नीलेश देशमुख (बारडकर) यांनी मुंबईत झालेल्या शासकीय बैठकीत या विषयावर ठोस पुराव्यांसह मांडणी करत शेतकर्‍यांचा दावा न्याय्य असल्याचे स्पष्ट केले.

https://agrowon.esakal.com/agro-special/banana-farmers-crop-insurance-74000-per-hectare-rat16

माहिती शेअर करा