नाशिक, निफाड, दिंडोरी, चांदवड व येवला तालुक्यांत सध्या एप्रिलमधील ‘खरड’ छाटणीला वेग आला आहे. कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून ही कामे वेळेत पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.उन्हाचा पारा वाढत असल्याने नवीन फुटीच्या संरक्षणासाठी नियोजन केले जात आहे. एकूणच, नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट व खर्चात वाढ होऊन शेतीचे अर्थकारण विस्कळीत झाले असले, तरी दर्जेदार उत्पादनाला मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या उमेदीने काम करण्याची जिद्द निर्माण झाली आहे.

द्राक्ष पट्ट्यात यंदा बहुसंख्य शेतकऱ्यांच्या बागांमध्ये उत्पादन नव्हते. ज्यांच्याकडे गुणवत्तापूर्ण माल होता, त्यांची निर्यात झाली; तसेच देशांतर्गत बाजारपेठेतही समाधानकारक दर मिळाले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. हंगाम संपताच बागायतदार विश्रांती न घेता पुढील वर्षाच्या तयारीला लागले आहेत.

बहुतांश शेतकरी आर्थिक कोंडीतच

गेल्या वर्षी ऑक्टोबरमधील अतिवृष्टी आणि त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीतील धुक्यामुळे ‘डाऊनी’ व ‘भुरी’सारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. परिणामी ५० ते ६० टक्के बागांमध्ये घड निर्मिती झाली नाही, तर ‘गळकुजी’मुळे मोठे नुकसान झाले. मात्र प्रतिकूल परिस्थितीतून वाचलेल्या दर्जेदार मालाला युरोप व आखाती देशांतून मोठी मागणी राहिली. इस्राईल, अमेरिका आणि इराणमधील युद्धपरिस्थितीचाही काही प्रमाणात परिणाम झाला. निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो १४० ते २१० रुपये, तर स्थानिक बाजारात ७० ते १२० रुपये दर मिळाले. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक आधार मिळाला; मात्र बहुतांश शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नसल्याने ते आर्थिक कोंडीतच आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/nashik-grape-pruning-april-season-rat16

माहिती शेअर करा