खरीप हंगाम २०२५ अंतर्गत शेतकरी आपल्या शेतातील ई-पीक पाहणी नोंदविण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डीसीएस मोबाइल ॲपद्वारे थेट शेतातून पिकांची पाहणी व नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी ॲपचा सर्व्हर वारंवार डाउन होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आधीच पाऊस अपुरा असल्याने खरीप हंगामातील उत्पादनाबाबत शाश्वती नाही. त्यातच ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी अधिकच चिंतेत आहेत. तासनतास शेताच्या चारही बांधांवर फिरूनही माहिती अपलोड होत नसल्याने वेळ, श्रम व मोबाईल डेटा वाया जात आहे. बामखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले की, ई-पीक पाहणीसाठी माहिती भरताना सर्व्हरशी संपर्क होत आहे, कृपया वाट पाहा असा संदेश सतत दिसतो.
परिणामी माहिती वेळेत सबमिट होत नाही.शासनाने कृषी क्षेत्रात पारदर्शकता व अचूक नोंदी ठेवण्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ योजना सुरू केली आहे. ग्रामपातळीवर शेतकऱ्यांना स्वतः मोबाईल ॲपद्वारे पिकांची माहिती भरायची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, ॲपमध्ये वारंवार लॉगिन समस्या, लोकेशन अचूक न दिसणे, सर्व्हर डाऊन होणे यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.