अमेरिका, इस्त्राईल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या परिस्थितीतही राज्यातील आंबा निर्यातीला सुरुवात झाली आहे. राज्य पणन मंडळाच्या विविध निर्यात सुविधा केंद्रांमार्फत अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे आतापर्यंत २७२ टन आंब्याची निर्यात झाली आहे. चालू हंगामात सुमारे २,५०० टन निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.
कदम म्हणाले, ‘‘यंदा आंबा निर्यातीवर आंतरराष्ट्रीय संघर्षाचे सावट होते. मात्र निर्यात सुरळीत राहावी, यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.’’हापूस, केशर आदी प्रमुख वाणांच्या निर्यातीसाठी वाशी, जामसंडे (रत्नागिरी) व बारामती येथील केंद्रांवर उष्णजल, बाष्प व विकिरण प्रक्रिया सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या सुविधांच्या माध्यमातून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, मलेशिया, कॅनडा व रशिया आदी देशांत निर्यात सुरू आहे. अमेरिकेतील निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या तपासणीकरिता निरीक्षक दाखल झाले असून त्यांच्या निकषांनुसार प्रक्रिया केली जात आहे.
समुद्रमार्गे निर्यातीला चालना
गेल्या वर्षीच्या यशस्वी प्रयोगानंतर यंदा समुद्रमार्गे आंबा निर्यातीवर विशेष भर देण्यात आला आहे. खासगी निर्यातदारांना प्रोत्साहन देत प्रक्रिया क्षमतेत वाढ करण्यात येत आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/mango-export-global-tension-rat16