वाढलेल्या तापमानापासून द्राक्ष बागेचे संरक्षण आणि पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी करून पाणी बचतीसाठी द्राक्ष बागेत मल्चिंगसाठी उसाच्या टाकाऊ पाचटाचा उपयोग जुन्नर तालुक्यातील अनेक द्राक्ष बागायतदार करीत आहेत. पाऊस पडल्यानंतर कूज होऊन या पाचटाचे कंपोस्ट खत होणार आहे. यामुळे कमी खर्चाची ही नैसर्गिक मल्चिंग बाष्पीभावन वेग नियंत्रण व कंपोस्ट खत अशी शेतकऱ्यांना बहुउद्देशीय लाभ देणारी आहे.
जुन्नर तालुक्यात एप्रिल महिन्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. मागील १५ दिवसांपासून तालुक्यात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान आहे. १८ एप्रिलला नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात ४०.३ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे, अशी माहिती शास्त्रज्ञ प्रशांत शेटे यांनी दिली.
वाढलेले तापमान व त्याबरोबरच वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात फूल व फळ गळ होत आहे. याचा एकूणच परिणाम उत्पादनावर व पिकाच्या गुणवत्तेवर झाला आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पिकांना जास्त पाण्याची गरज निर्माण होत आहे. पाणीटंचाई व त्याबरोबरच तळपत्या सूर्यामुळे वाढलेला बाष्पीभवनाचा वेग याचा सामना करण्यासाठी कमी खर्चिक पाचटाची मल्चिंग शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.
अशी करतात मल्चिंग
बागेत पाचट पसरवण्यासाठी मजुरी खर्च : १५०० रुपये. (घरी उसाचे पीक असल्यास पाचट खरेदीचा खर्च कमी होतो)
द्राक्ष वेलींच्या खोडाजवळ असलेल्या वरंब्यावर पाचटाचे आच्छादन घातले जाते.
पाचट मल्चिंगसाठी एकरी खर्च : ७५०० रुपये.
एक एकरासाठी पाचटाच्या २०० गाठी (वजन सुमारे १ टन) लागतात.
एक गठलीची किंमत : २५ ते ३० रुपये.
एकूण सुमारे खर्च : सहा हजार रुपये.
https://agrowon.esakal.com/agro-special/grape-farming-straw-mulching-benefits-rat16