अर्ली द्राक्ष हंगामात यंदा उत्पन्न मिळण्याची आशा होती. कर्ज काढून बागा जगविल्या. पण पावसाने घात केला. सोन्यासारखा द्राक्षमाल मातीमोल झाला. थोडाफार माल वाचला, त्यातून खर्चही निघणार नाही, अशी भयानक परिस्थिती आहे. राज्य सरकारने क्रॉपकव्हर योजना आणली; मात्र अटी-शर्तींमुळे काहीच फायदा नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांना यंदाही ‘तडा’ गेला, अशी वेदनादायी परिस्थिती बिजोटे (ता. बागलाण) येथील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक शेतकरी पोपट जाधव सांगत होते.
गेल्या सहा वर्षांपासून कसमादे भागातील अर्ली द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अस्मानी संकटांनी ग्रासले आहे. यंदाही मॉन्सूनोत्तर पावसाने १९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान तडाखा दिल्याने जवळपास ३५० एकरवर फटका आहे. यापूर्वी कसमादे भागात १,५०० हेक्टरवर अर्ली द्राक्ष उत्पादन घेतले जायचे. मात्र दरवर्षीच्या नुकसानीमुळे बागा तुटून क्षेत्र ४० टक्क्यांवर आले आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण द्राक्ष माल तयार केला. मात्र अतिवृष्टीने स्वप्नांचा चक्काचूर केला.