परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सोमवारी (ता.५) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. बहुतांश भागात जोरदार वारे वाहिले. केळीची झाडे मोडून पडली.

आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली. संत्रा, मोसंबी आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास निसर्गाने हिरावला. शेडनेटगृह, सौर कृषिपंपाचे पॅनेलचे नुकसान झाले. घरे, गोठ्यावरील पत्रे उडून गेली. तारा तुटल्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला.

परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सोमवारी (ता.५) सायंकाळी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांतील अनेक मंडलांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक होता. जोरदार वाऱ्यामुळे पेडगाव, सिंगणापूर, सजपूरजवळा (ता.परभणी), कान्हेगाव (ता.पूर्णा) आदी गावांतील निसवलेल्या केळी बागा तसेच संत्रा आदी फळांचे अतोनात नुकसान झाले.

परिपक्व झालेले आंबे गळून पडले आहेत. जिंतूर तालुक्यातील अनेक भागांत वाऱ्यासह पाऊस झाला. मानवत तालुक्यातील मानवत, रुढी, खरबा, कोल्हा, उकलगाव, कोथाळा, सावंगीवाडी आदी गावांतील आंबा, संत्री, मोसंबीची झाडे मोडून पडली. शेडनेटगृहाची हानी झाली. हळद काढणीची कामे सुरू आहेत. शिजवलेली हळद शेतामध्ये वाळवत घातली आहे. पावसात भिजून होणारे नुकसान टाळण्यासाठी हळद झाकून ठेवताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

https://agrowon.esakal.com/agro-special/strong-winds-damage-banana-and-mango-crops-rat16

माहिती शेअर करा