शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, यावर उपाय म्हणून कृषी विभागाकडून ‘महाविस्तार एआय’ हे अत्याधुनिक ॲप विकसित करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने हे ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन करते.
महाविस्तार एआय ॲपमधील ‘एआय चॅटबॉट’ शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल-टाइम हवामान अंदाज, स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल-टाइममध्ये दाखवते. कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतील. ॲपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी आणि जैविक शेती याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल.
https://agrowon.esakal.com/agro-special/mahavistar-ai-app-for-farmers-from-krishi-rat16