वाणिज्य मंत्रालयाच्या ‘कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणा’च्या (अपेडा) माध्यमातून यापूर्वी अमेरिकेत हवाई व समुद्री मार्गाने प्रायोगिक निर्यात चाचणी झाली होती. तर फेब्रुवारी-२०२५ मध्ये तांत्रिक व व्यवहार्य बाजू अभ्यासून महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाच्या भगव्या वाणाची समुद्री वाहतुकीद्वारे अमेरिकेच्या बाजारपेठेत यशस्वी निर्यात करण्यात आली आहे.
यापूर्वी झालेली हवाईमार्गे निर्यात खर्चिक होती, आता समुद्री वाहतुकीद्वारे खर्च निम्म्यावर आला आहे. लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक निर्यातीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. औषधी गुणधर्म व पोषण मूल्यांमुळे डाळिंब फळांची विशेष मागणी असते. देशात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेशमध्ये लागवडी आहेत.
प्रमुख निर्यात होणाऱ्या देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती (यूएई), बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहरीन, ओमान यांसह अमेरिकेचा समावेश आहे. मात्र २०१८ मध्ये अमेरिकेत सुरू असलेली निर्यात तांत्रिक कारणांमुळे ५ वर्षे ठप्प झाली. त्यामुळे निर्यात पूर्ववत करण्यासाठी ‘अपेडा’ व कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्थायांनी संयुक्तरीत्या अमेरिकेच्या कृषी विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर २०२२ मध्ये निकष व निर्यात पद्धती निश्चित होऊन पुन्हा निर्यात सुरू होण्यास हिरवा झेंडा मिळाला.
‘अपेडा’, ‘युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चर’, ‘अॅनिमल ॲण्ड प्लांट हेल्थ इन्स्पेक्शन सर्व्हिस’, ‘राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था’ आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र (सोलापूर) यांचे संयुक्त कामकाज तर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील किरणोत्सर्ग सुविधा केंद्रावर प्रक्रिया करून जुलै-२०२३ मध्ये हवाई मार्गाने निर्यात चाचणी घेण्यात आली. अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाने माईट वॉश, सोडिअम हायपोक्लोराइड प्रक्रिया, वॉशिंग ड्राईंग आदी प्रक्रिया बंधनकारक केल्या होत्या.