पश्चिम आशियातील संघर्ष आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या दरांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाने ‘३ एफ’ अर्थात इंधन (फ्युएल), खत (फर्टिलायझर) आणि परकीय चलन (फॉरिन एक्स्चेंज) यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, खतांचे चढे दर आणि परकीय चलनावरील दबाव यामुळे देशासमोर आर्थिक आव्हाने निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना सीतारामन म्हणाल्या, ‘‘पंतप्रधानांनी परकीय चलनाची बचत करण्याचे केलेले आवाहन अत्यंत महत्त्वाचे आहे. इंधन, खत आणि परकीय चलन या ‘३ एफ’कडे त्याच संदर्भात पाहण्याची गरज आहे.’’अमेरिका-इस्राईल आणि इराण संघर्षामुळे हॉर्मूझ सामुद्रधुनीतील पुरवठा विस्कळीत झाला असून, त्याचा थेट परिणाम भारतावर होत आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कच्चे तेल आयात करणारा आणि वापरणारा देश असल्याने वाढत्या दरांचा परिणाम इंधन खर्च, खत आयात आणि व्यापार तुटीवर होत आहे.
सरकारने मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ केली आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय किमतींमुळे निर्माण झालेला तेल कंपन्यांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.सीतारामन यांनी सांगितले, की इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे २०२६-२७ आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या महसुलावर सुमारे १ लाख कोटी रुपयांचा परिणाम होऊ शकतो. त्याच वेळी खतांचे दर ‘अकल्पनीय’ पातळीवर पोहोचल्याचेही त्यांनी नमूद केले.
https://agrowon.esakal.com/agro-special/fuel-fertilizer-forex-alert-nirmala-sitharaman-rat16