लेझर विडिंग यंत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. तसेच हाय-स्पीड कॅमेरे बसवलेले असतात. त्याच्या माध्यमातून तणाची ओळख पटवून त्यावर लेझरचा मारा केला जातो. त्याच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. सध्या पाश्चिमात्य देशात मका, कपाशी, सोयाबीन आणि प्रामुख्याने भाजीपाला पिकांमध्ये या तंत्रज्ञानांचा वापर सुरू झाला आहे. तसेच सेंद्रिय शेतीमध्ये रसायनांना पूर्ण बंदी असते, तिथे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातील मोठ्या शेतांमध्ये हे तंत्रज्ञान वेगाने पसरत आहे.

शेतात तण माजलंय, खुरपणीला मजूर मिळत नाहीत. मग अशा परिस्थितीत तणनाशकाच्या फवारणीशिवाय पर्याय नाही. मग रासायनिक तणनाशकावरची भिस्त वाढते. म्हणजे जे काम गावातील शेतमजूर करू शकत होता, ते काम करायला (कदाचित) सातासमुद्रापलीकडला रासायनिक मजूर वापरावा लागला. महत्त्वाचे म्हणजे अजूनही भारतात एकही जैविक तणनाशक बनलेले किंवा वापरले जात नाही. म्हणजे शेतीला रसायन पाजणे अपरिहार्य झाले. बरं हे तणनाशक फवारणीसाठी शेवटी मजूर हवाच की. शेतमजूर ही सध्या (शेत) मजबुरी झाली आहे.

जगभरात या समस्येवर उपाय शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. आपल्याकडचा मजूर मिळणे अवघड झाले आहे, तर विकसित देशात तेथील महागाईमुळे तो अति महाग झालाय. पूर्व असो की पश्चिमी देश, दोघांची डोकेदुखी एकच. अमेरिका आणि युरोपियन देशात मजूर आणि रसायनांवरील परावलंबित्व कसे कमी करावे यावर संशोधन केले जात आहे. आणि यातूनच मजूर किंवा रसायन न वापरता पिकाला धक्का न लावता लेझरच्या साह्याने तण जाळणारे तंत्रज्ञान विकसित झाले. या तंत्रज्ञानाला ‘लेझर विडिंग’ असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं, तर रासायनिक तणनाशक न फवारता आणि खुरपणी न करता, थेट लेझरच्या प्रकाशझोताने तण जागेवरच जाळलं जातं !

https://agrowon.esakal.com/techno-wan/ai-laser-weeding-machine-smart-farming-marathi-rat16

माहिती शेअर करा